मोरागड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती
Moragad Fort Information in Marathi
• स्थान :
भारतातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात मोरागड हा सह्याद्री पर्वतात वसलेला आहे.
• याठिकाणी जोडकिल्यांची एक जोडी दिसून येते. एक मोरागड व दुसरा मुल्हेर.
• उंची :
या किल्ल्याची सरासरी समुद्र सपाटी पासून १३५७ मीटर आहे.
• मोरागड गडावर जाण्यासाठी मार्ग :
• नाशिक शहरापासून थेट – दिंडोरी – वणी – साल्हेरवाडी – वाघांबे मार्गे मोर गडाला जाता येते.
• नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मार्गे मालेगाव - वडनेर – नामपूर – ताहाराबादमार्गे – मोरागड
• मोरागड किल्याची माहिती :
• नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात मोरागड आहे. गडाच्या पायथ्याशी आल्यावर आपणास समोर दोन जोड किल्याची जोडी दिसते. त्यातील एक आहे मोरागड तर दुसरा मुल्हेर.
• मोरागड मुल्हेर जवळ एक धर्मशाळा आहे. उद्धव महाराज धर्मशाळा या ठिकाणी आपल्याला राहण्यासाठी उत्तम सोय आहे. सकाळी उठून आपण गड भ्रमंतीसाठी जाऊ शकतो.
• पहिली तटबंदी व गडाचा भग्न दरवाजा :
किल्याच्या दिशेने चालू लागल्यावर आपणास प्रथम एक तटबंदी लागते. व किल्याचा प्रथम दरवाजा लागतो. याची बरीचशी मोडतोड झाली असून सध्या उभ्या चौकटीचे स्तंभ पाहायला मिळतात.
• पुढे एक वाटेत छत्री लागते. तिथून पुढे गेल्यावर आपणास काही पडक्या वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात.
• भव्य तलाव :
पुढे गेल्यावर आपल्याला एक भव्य बांधकाम केलेला तलाव लागतो. त्यामधे पाण्याची उंची मोजण्यासाठी एक स्तंभ पाहायला मिळतो.
• महादेव मंदिर :
तलावाच्या शेजारी सुरेख महादेव मंदिर पाहायला मिळते. या मंदिरासमोर भव्य सभामंडप असून आतील बाजूस एक शिवलिंग पाहायला मिळते. त्या मागे एक गणेशमूर्ती देखील पाहायला मिळते. सभामंडपात स्तंभ व कमानाकृती महिरप पाहायला मिळते.
• सोमेश्वर मंदिर :
पुढे पायवाटेने गेल्यावर आपणास सोमेश्वर मंदिर पाहायला मिळते. तळ्याकाठी असणाऱ्या मंदिरासारखेच या मंदिराचे देखील बांधकाम आपणास पाहायला मिळते. या मंदिरा जवळील माहितीवरून असे समजते की या मंदिराचे बांधकाम इसवी सन १४८० साली झाले आहे. आतील बाजूस खोलवर गाभारा आहे. गाभाऱ्यात महादेव पिंड आपणास पाहायला मिळते हे मंदिर बाभुळराजे यांनी बांधले असावे. गाभार्या समोरील सभामंडपात नंदी विराजमान आहे. सभामंडपातील वरील कमानरुपी महिरपी मध्ये सुरेख जाळीकाम केल्याचे दिसून येते. यातून रोज सकाळी सूर्य किरणे थेट महादेव पिंडीवर पडतात. हा एक उत्कृष्ट बांधकामाचा नमुना दिसून येते.
सोमेश्वराचे दर्शन घेऊन वरील दिशेने गेल्यावर आपण मोरागड व मुल्हेर गडास जोडणाऱ्या मध्यभागी असणाऱ्या खिंडीत पोहोचतो.
• खिंडीतील भिंत :
मुल्हेर व मोरागड हे एकमेका जवळ असल्याने ते एकमेका सहाय्यक आहेत. एखादा शत्रू एका गडाच्या साहाय्याने दुसरा सहज जिंकू नये यासाठी जेव्हा हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला तेव्हा या खिंडीत शिवरायांनी एक भक्कम भिंत उभी केली. जा भिंतीच्या वरील बाजूस जंग्या व फांज्या बनवल्या गेल्या आहेत. शत्रूशी पहिली चकमक इथेच उडू शकते. हे जाणून भक्कम भिंत बांधली गेली आहे.
• भिंती पलीकडे गेल्यावर आपणास दोन मार्ग दिसतात. त्यापैकी एक मुल्हेर गडावर जातो. तर दुसरा मोरा गडावर जातो. मोरागडाकडे जाणाऱ्या वाटेने आपण पुढे गेलो की अत्यंत उंच उत्तुंग असा कात्याळ डोंगर पाहायला मिळतो. तो आहे मोरागड
• पाणी टाके :
गडाच्या पायरी मार्गाजवळ एक पाण्याचे खोदीव टाके आपणास पाहायला मिळते. या टाक्याजवळून पायरी मार्ग जातो.
• खोदीव पायरी मार्ग :
टाक्या जवळून पायरी मार्ग लागतो. तो संपूर्णतहा खडकात कोरलेला आपणास पाहायला मिळतो. खडकात खोदल्याने तो आजही सुस्थितीत आहे. केवळ छिनी हतोड्याचा वापर करून याची निर्मिती केल्याचे दिसून येते.
• महादरवाजा :
पायरी मार्ग चढून वर आल्यावर आपणास एक भव्य दरवाजा लागतो. कोरीव काळ्या बेसाल्ट खडकात कोरलेले स्तंभ व वर नक्षीदार कमानी ,घोटीव व गुळगुळीत असा हा दरवाजा किल्याची शोभा वाढवून व संरक्षण करतो. या दरवाजाच्या दोन्ही बाजूस हिंदू देवतांच्या मुर्त्या कोरलेल्या असून त्यापैकी एक गणेश मुर्ती तर दुसरी अस्पष्ट आहे. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी बांधलेल्या विश्रांतीसाठी देवड्या आहेत. आतील बाजूस असणाऱ्या बांधकामाची थोडीफार पडझड झालेली दिसून येते.
वरील चौकटीच्या बाजूस हिंदू धर्माचे पवित्र प्रतीक असलेली कमळाची नक्षी कोरली असून. त्यावरील महिरप अत्यंत लोभसवानी वाटते. आकर्षक आहे.
• भग्न अवस्थेत असणारा दुसरा दरवाजा :
महादरवाजातून आत आल्यावर थोडे चढून वरती जावे लागते. तिथून वर जाताना आजूबाजूला पडलेले काही दगड पाहायला मिळतात. तिथून पुढे चढून गेल्यावर आपणास उंबरा स्तंभ व चौकटीचे अवशेष आढळतात. बाजूची भिंत थोडीफार शाबूत आहे. हा दुसरा दरवाजा. किल्याचा महादरवाजा जरी शत्रूने काबीज केला तर दुसऱ्या या दरवाजामुळे शत्रूस अडकाठी येते. पण काळाच्या ओघात व शासकीय तसेच स्थानिक लोकांच्या दुर्लक्षते मुळे याची दुरावस्था झालेली दिसते आहे.
• या दरवाजा मधून किल्याच्या वर जाता येते. येथून गडावरील भागातून खालील कात्याळ पायरी वाट दिसून येते. तसेच किल्याच्या तटावर देखील येथून जाता येते. या ठिकाणाहून दोन्ही किल्याच्या मधील अरुंद घळई पाहायला मिळते.
• पाणी टाके :
तिथून पुढे आल्यावर लगेच एका बाजूस आपणास पाण्याचे टाके खडकात खोदलेले दिसते. हल्ली उन्हाळ्यात ते आटलेले दिसेल. गडाचे तट बुरुज बांधताना लागणारे दगड तसेच तटाचे व इतर बांधकाम करण्यासाठी लागणारे दगड येथूनच घेतले होते.
• खडा खडतर पायरी मार्ग:
या ठिकाणाहून पुढे खडा चढ लागतो. तो काही ठिकाणी कात्याळ तर काही ठिकाणी पायरी बसवलेला. व काही ठिकाणी पायऱ्या कोरलेला आहे. येथून वर चढून आपण वक्राकार वळण करून किल्याच्या वरील दुसऱ्या महादरवाजा जवळ जाऊन पोहोचतो.
• दुसरा महादरवाजा :
वक्र अर्धगोल चढ चढून वरील बाजूस गेल्यावर आपल्याला दुसरा एक भव्य दरवाजा लागतो. हा किल्याच्या वरील बाजूस घेऊन जातो. याची रचना देखील खालील बाजूस असणाऱ्या दरवाजाप्रमाणेच आहे. याच्याही आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवड्या बांधलेल्या पाहायला मिळतात
या महादरवाज्यातून आपणास गडाखालील जंगल व सोमेश्वर मंदिर, महादेव मंदिर, हरगड. व शेजारील मुल्हेर किल्ल्याचा वरील भाग स्पष्ट दिसतो.
• कठीण कात्याळ पठार :
दुसऱ्या महादरवाजामधून वर जाण्यास पायरी मार्ग आहे. त्या मार्गाने वर आल्यावर आपणास विस्तीर्ण कात्याळ असणारे पठार पाहायला मिळते. यावर काही ठिकाणी मातीचे पातळ आवरण आहे. जागोजागी गवत उगवलेले दिसते.
• पहिले पाणी टाके:
समोरील एका पायवाटेने पुढे गेल्यास आपल्याला जोड असलेले पाणी टाके पाहायला मिळते.
• राजवाड्याचे अवशेष :
थोडे पुढे गेल्यावर आपणास काही दगडी ढीग तर काही स्वरूपात बांधकाम पाहायला मिळते. त्या ठिकाणी मध्ययुगात राजवाडा असावा असे तज्ञांचे मत आहे.
• किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष :
तिथे जवळच किल्याच्या किल्लेदारास बांधलेल्या वाड्याचे अवशेष देखील पाहायला मिळतात.
• बांधकाम अवशेष :
किल्यावर आपण पाहणी करत गेल्यास आपणास जागोजागी पडलेल्या अवशेषावरून या ठिकाणी किल्याच्या शिबंदित असणारी कुटुंबे राहत असावीत त्यांच्या घराचे अवशेष आपणास पाहायला मिळतात. जवळ जवळ ६० ते ७० घरांचे अवशेष असावेत.
जवळ जवळ किल्यावर चारपाचशे लोक तरी राहत असावीत. किंवा त्यापेक्षा जास्त याचा अंदाज अवशेष बघून येतो.
• विशाल टाके क्र. २ :
थोडे पुढे गेल्यावर आपणास एक मोठे खोदीव टाके पाहायला मिळते. यामध्ये आपल्याला पाणी पाहायला मिळते. सततच्या उन्हामुळे त्यामध्ये शेवाळाची निर्मिती झाली आहे. गडावरील पाण्याची गरज भागवणेसाठी याची निर्मिती केली असावी.
• गंगासागर तलाव :
पाण्याच्या टाक्यापासून आपण थोडे पुढे गेल्यावर एक विशाल तलाव लागतो. या किल्याच्या वरील हा एकमेव मोठा पाण्याचा स्त्रोत आहे. कात्याळ टेकडीचा उतार लक्षात घेऊन याची निर्मिती केल्याचे दिसते. एका बाजूला बांधीव तट असलेली भिंत बांधून बनवलेला हा तलाव उन्हाळ्यात देखील येथे पाणी असते.
• राणीमहाल :
गंगासागर तलावाशेजारी आपणास थोडे बांधकाम अवशेष पहायला मिळतात. ते राणीमहालाचे आहेत.
• कड्याशेजारी असणारे तिसरे पाणी टाके :
पुढे चालत गेल्यावर गडावरील पाणी ज्या ठिकाणाहून खाली कोसळेल त्या ठिकाणी आपणास एक विशाल खोदीव टाके पाहायला मिळते. या ठिकाणी खोदकाम करून यातील दगड बांधकामास वापरल्याचे व याठिकाणी पाणीटाके बनवल्याचे दिसते.
• किल्यावर काही ठिकाणी राहुट्या म्हणजे हंगामी तळ उभा करण्यासाठी कात्याळात छिद्रे पाडलेली आहेत. ती देखील पाहायला मिळतात. ऊन व पावसात तात्पुरता शिबंदितील पहारेकऱ्यांसाठी निवारा तेथे करता येत होता.
• या ठिकाणी थोडे कड्याशेजारी उभे राहिल्यावर उभे राहून निरीक्षण केले तर आपणास दूर असणाऱ्या मांगी तुंगी किल्याचे दर्शन व त्याखालील वाट देखील दिसते.
तसेच सह्याद्री पर्वतातील अनेक शिखरे दिसून येतात.
• मोरागड किल्याची ऐतिहासिकदृष्ट्या माहिती :
• मोरागड व मुल्हेर हे जोडकिल्ले असून या किल्याच्या परिसरात असणाऱ्या अनेक ठिकाणांचा उल्लेख हा महाभारत काळाशी जोडला जातो.
• हा किल्ला सुरत बुऱ्हाणपूर या मार्गावर असल्याने हा मार्ग जुना व्यापारी मार्ग होता तेव्हा टेहेळणी करण्यासाठी या किल्याची निर्मिती केली गेली व टेहेळणीसाठी वापर केला जात असे.
![]() |
| मोरागड वरून दिसणारा हरगड किल्ला |
• शालिवाहन व सातवाहन काळात या ठिकाणी जवळ असणाऱ्या मुल्हेर किल्यावर अनेक गुहांची निर्मिती केली असावी असे मानले जाते.
• इसवी सनाच्या १३ व्या शतकात बाभुळराजे या राजाची राजवट या ठिकाणी होती. मुल्हेर व मोरागड हे एकत्रित जोडकिल्ले आहेत. बाभुळराजा व सम्राट अकबर यांची मैत्री होती. बऱ्याच वेळा लष्करी मदत ही सम्राट अकबराने केल्याचे दिसून येते.
• शहाजहान जेव्हा बादशहा झाला त्यावेळी त्याने या प्रांतात इसवी सन १६३८ आली औरंगजेब या आपल्या मुलाची नेमणूक केल्यावर त्याने या भागावर आक्रमण करून हा प्रदेश मुघल साम्राज्यात जोडला.
• इसवी सन १६७२ साली सुरतेची दुसरी लूट केल्यावर परत स्वराज्यात येत असताना छत्रपती शिवराय यांनी हा प्रदेश जिंकून घेतला.
• या जोडकिल्यांची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी छत्रपती शिवरायांनी या दोन किल्ल्यांमध्ये असणाऱ्या घळीत एक भिंत उभी केली व गडांच्या सुरक्षिततेसाठी योजना केली.
• पुढे हा किल्ला पेशवाईत गेला.
• इसवी सन १८१८ साली ब्रिटिशांनी जेव्हा पेशवाईचा अस्त केला. तेव्हा मराठ्यांकडून हा किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला. त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असणाऱ्या बांधकामाची नासधूस केली.
• इसवी सन १५ ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या अखत्यारीत आला..
• अशी आहे मोरागड किल्याची ऐतिहासिकदृष्ट्या माहिती.
Moragad Fort Information
maharashtrakillevsthaledarshn.blogspot.com

































कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l