गांधार लेणी / पाले लेणी / बुद्ध लेणी समुह संबंधी ऐतिहासिक माहिती
Gandhar – pale Leni samuha vishyi mahiti Buddist Caves
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागात रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील पाले – गंधार या गावाजवळील डोंगरात आपल्याला गंधार- पाले लेणी समुह पहायला मिळतात.
• उंची : अंदाजे २०० ते ३५० मीटर उंचीवर कात्याळ खडकात ही लेणी खोदलेली आहेत.
• लेणी पहायला जाण्यासाठी प्रवासी मार्ग :
• मुंबई हे रस्ते, लोहमार्ग, विमान सेवा याद्वारे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय शहरांना जोडलेले ठिकाण आहे. येथून मुंबई गोवा हायवेवर महाड गावाजवळ दोन किलोमीटरवर गंधार व पाले या गावाजवळ आपल्याला डोंगरात ही लेणी पहायला मिळतात.
• गोवा या आंतरराष्ट्रीय ठिकाणापासून गोवा – कणकवली – चिपळूण - पोलादपूर – महाड - येथून पाले – गंधार येथून मुंबई गोवा हायवेवर हा बुद्ध लेणी समुह आहेत.
• पुणे – मूळशी – पाटणस - ताम्हिणी घाट – माणगाव – लोणेरे – दासगाव – गंधार – पाले. येथून बुद्ध लेणी समुह पाहायला जाता येते.
• प्रेक्षणीय स्थळे :
• महाड या शहरातून आपण खाजगी वाहनाने किंवा भाडोत्री वाहनाने या पाले – गंधार लेणी समूहाजवळ आल्यावर आपण तिथे पायथ्याशी आपले वाहन पार्क करू शकतो.
• पायरी मार्ग :
तेथून लगेच आपल्याला एक पायरी मार्ग लागतो. या मार्गानं चालत. - चालत आपण लेणी समुह पाहायला जाऊ लागतो. वाटेत लेण्यातून बाहेर भग्न होऊन पडलेले स्तूप पायरी मार्गाच्या बाजूला उभे केलेले दिसून येतात. या पायरी मार्गाने आपण लेणी समूहात पोहोचतो. प्रथम आपल्याला लेणी क्रमांक २८ व २९ लागतात.
• लेणे क्रमांक १ :
हे एक चैत्यगृह आहे. बाहेरील बाजूस विस्तीर्ण स्तंभ आहेत. त्याच्या आतील बाजूस व्हरांडा आहे. त्यानंतर समिती सभागृह लागते. या ठिकाणी अनेक चारक, तपस्वी भिक्षू बसून बुद्ध धर्मीय तत्वज्ञान यावर चर्चा बसून करत असत. आतील बाजूस विश्रांती कक्ष आहेत. अंदाजे ८ फूट रुंद व ५३ फूट लांब ही संरचना असल्याचे जाणवते. समितीसभागृहाच्या आतील बाजूस गर्भगृह आहे. तेथे बुद्ध मूर्ती शिल्प असलेला लयन स्तंभ आहे. बुधांची मूर्ती शेजारी काही सेवक चक्रपाणि, पद्मपाणि, अश्वपाणि यांच्या भग्न मूर्ती पाहायला मिळतात. बुद्ध मूर्तीवर दोन्ही बाजूस गंधर्व कोरलेले पहायला मिळतात. ते बुधांची सेवा करत आहेत. या ठिकाणी हीनयान काळातील ही संरचना असून नंतर बुद्ध प्रतिमा निर्माण करून महायान पंथाच्या काळात मंदिर निर्मिती केल्याचे दिसते. हे एक महायान लयन मंदिर आहे. बुद्धस्तंभ परिक्रमा करण्यासाठी बाजूने मोकळी जागा आहे. जागोजागी अनेक प्रकाश संक्रमण होण्यासाठी गवाक्षे ठेवलेली दिसतात.
• पाण्याची पौडी ( टाके ) :
लेण्याच्या बाहेरील बाजूस थोड्या अंतरावर एक पाण्याचे टाके खडकात खोदलेले दिसून येते. पावसाळ्यात डोंगर माथ्यावरून पडणारे पाणी यांमध्ये साठवले जात असे. ते पाणी पिण्याच्या पाण्याची तसेच खर्चाच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी यांची रचना केली गेल्याची दिसून येते. ही लेणी छिन्नी हातोडा वापरून बनवली गेली आहेत.
• लेणी क्रमांक २ कुठे दिसत नाहीत. ते भग्न झाल्याचे जाणवते.
• लेणी क्रमांक ३ :
लेण्यांच्या बाहेरील बाजूस पायऱ्या आहेत. त्यानंतर एक छोटा व्हरांडा असून आतील बाजूस शयन व ध्यान कक्ष खोदून बनवल्याचे दिसते. ही एक विश्रांती निवास वास्तू आहे. जी चारक भिक्षूंसाठी बनवली आहे.
• लेणी क्रमांक ४ :
लेण्याच्या बाहेरील डोंगर भाग जाण्यास खडतर आहे. या लेण्यात सुंदर गर्भगृह आहे. व आतील बाजूस शयन व ध्यानकक्ष पहायला मिळतो.
• लेणी क्रमांक ५ :
पाच नंबरची लेणी ही एक छोटे सभागृह जाणवते. सभोवती बैठक ओटा आहे. आतील बाजूस शयन व ध्यानकक्ष आहेत. लेणी क्रमांक चार व पाच मध्ये छिद्र गवाक्ष दिसून येते. ते पूर्वी संपर्कासाठी बनवले की काळाच्या ओघात ते आपोआप पडले हे समजत नाही. पण दोन लेण्यातील भिक्षूंच्या संपर्कासाठी उत्तम देवघेव मार्ग असल्याचे दिसून येते.
• लेणी क्रमांक ६, ७, ८ :
काळाच्या ओघात या लेणी नष्ट झाल्याच्या दिसून येतात. थोड्याफार खुणा शिल्लक आहेत.
• लेणे क्रमांक ९ :
नऊ नंबरचे लेणे भग्न सभागृह असलेले आहे. आतील बाजूस ध्यानकक्ष व शयन कक्ष आहेत. आतमध्ये गर्भगृह आहे. त्यामध्ये एक स्तूप होता. तो नष्ट झालेला दिसून येतो. त्याच्या खुणा शिल्लक राहिल्या आहेत. या लेण्यामध्ये आपल्याला एक येथे शिलालेख पहायला मिळतो. लेण्याच्या बाहेरील बाजूस पाण्याच्या पौडी म्हणजेच टाक्या आहेत. एकून सलग तीन टाकी आपणास पाहायला मिळतात. स्नानसंध्या करण्यासाठी व पेयजलासाठी उपयुक्तता म्हणून यांचा वापर केला जात असे.
• लेणे क्रमांक १० :
लेण्यात बाहेर ओवरी आतील बाजूस शयनकक्ष व ध्यानकक्ष पाहायला मिळतो.
• लेणे क्रमांक ११ , १२, १३, व १४
११ व १२ ही लेणी वरील बाजूस दुसऱ्या मजल्यावर आहेत. इतर लेण्यासारखी यांची रचना दिसून येते. १३ नंबर लेण्याच्या बाहेरील बाजूस स्तंभ आहेत. आतील बाजूस विश्रांती कक्ष आणि ध्यान कक्ष आहेत. तसेच १४ वे लेणे विहार आहे.
• लेणे क्रमांक १५ चा बाहेरील भाग पर्वताच्या भूस्खलनाने तुटलेला असून. यामध्ये एक स्तूप आहे. ही जुन्या काळातील हीनयान बुद्ध लेणी आहेत. येथे आपल्याला भिंतीत कोरलेला स्तूप दिसून येतो. स्तूपावर सुंदर वेदिका पट्ट दिसून येतो. तत्कालीन येथे सामूहिक ध्यानकक्ष व वार्तालाप या ठिकाणी होत असावा.
• लेणी क्रमांक १४ व १६ एकत्र जोडलेली आहेत. त्यांमध्ये ध्यानकक्ष व शयनकक्ष दिसून येतात.
• लेणे क्रमांक १७ चे बाहेरील बाजूस पाण्याचे टाके आहे.
• लेणी क्रमांक १८ बाहेरून भग्न झालेले आहे. आतील भाग फक्त शिल्लक आहेत.
यामध्ये ध्यानकक्ष व शयनकक्ष शिल्लक आहेत.
• लेणे क्रमांक १९ :
बाहेरील बाजूस बाह्य मंडप, आत समिती सभागृह त्याच्या आतील बाजूस विश्रांती कक्ष दिसून येतात. ही संरचना एकत्रित ध्यानकक्ष तसेच शिक्षा कक्ष म्हणून वापरली जात असावी. या ठिकाणी वयस्क भिक्खू नव बौद्ध अनुयायांना शिक्षण देत असावेत.
• लेणी क्रमांक २० भग्न झालेली आहेत.
• लेणे क्रमांक २१ :
या लेण्याच्या आतील बाजूस एक स्तूप कोरलेला आहे.
• लेणे क्रमांक २२ भग्न असून आतील विहार आहे.
• लेणे क्रमांक २३ :
बाहेरील बाजूस व्हरांडा व आतील बाजूस विश्रांती कक्ष आहे. कक्षामध्ये उजेड जाण्यासाठी गवाक्षे ठेवलेली आहेत. बाहेरील बाजूस डावीकडे पाण्याचा कुंड आहे. व्हरांड्यास असणारा कठडा सुंदर नक्काशी कोरलेला दिसून येतो.
• लेणी क्रमांक २४ व २५ भग्न अवस्थेत आहेत. आतील बाजूस आपल्याला असलेली दालने दिसून येतात. आतील बाजूस शयन व ध्यानकक्ष आहेत.
• लेणी क्रमांक २६, २७ :
ही लेणी देखील विहार आहेत. याचा काही भाग भग्न झालेला दिसून येतो. सत्ताविसाव्या लेण्यात आपल्याला एक स्तूप कोरलेला पहायला मिळतो. त्या शेजारी दान देणाऱ्या राजाची माहिती देणारा शिलालेख आहे.
• लेणी क्रमांक २८ व २९ :
ही विहार लेणी आहेत.
• लेणी समूहाविषयी महत्वपूर्ण माहिती :
सदर लेणी समूह हा लयन मंदीर समूहात येतो. बौद्ध धर्माच्या स्थापनेनंतर पुढे या धर्माचा संपूर्ण भारतभर प्रसार झाला. हा प्रसार अनेक राजांच्या काळात होऊन गेलेल्या बौद्ध धर्माच्या आचार्य व शिष्य यांच्या द्वारे केला गेला. अनेक राजांच्या काळात या धर्मास राजाश्रय मिळाला. अनेक चारक व्यापारी घाट मार्गानं सर्वत्र फिरस्ती चारिका म्हणजेच पायी चालत बौद्ध धर्माच्या तत्वद्नानाचा प्रसार करत असत. त्यांना वर्षा ऋतुकालात तसेच भ्रमंती काळात विश्रांती घेण्यासाठी तत्कालीन राजे, रजवाडे, सरदार, , व्यापारी, कृषक यांच्या मिळालेल्या देणगीतून अनेक शिल्प व पाथरवट यांच्या मदतीने सुरेख अशा छिन्नी हातोडा वापरून येथे चैत्य व विहारांची निर्मिती केली गेली. या ठिकाणी निर्माण झालेल्या या संरचना यांचा वापर भिक्षूचे राहणे, ध्यानधारणा करणे, धार्मिक ज्ञानप्राप्ती शिष्यांना देण्यासाठी. यासारख्या कामासाठी या वास्तूंचा वापर केला जात असे. यासाठी येथे गवाक्ष संरचना असलेल्या खोल्या आतील बाजूस दगडात खोदून बनवलेली ध्यान बैठक व शयन गृहे तयार केलेली दिसतात.
• स्तूप :
हिनयान पंथाच्या काळात येथे अनेक स्तूप निर्माण झाले. स्तूप हे बुधाच् प्रतीक मानून उपासना केली जात असे. स्तूपाच्या वरील बाजूस बुद्ध भिक्षूच्या अस्थी अवशेष ठेवले जात. त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्मिती करून या ठिकाणी ज्ञानार्जन करण्यात येई. तसेच परिक्रमा केली जात असे. पुढील काळात महायान पंथाच्या अनुयायांनी मूर्ती स्थापना सुरू केली. व स्तूपाच्या जागी बुध मूर्तीची उपासना सुरू केली. त्यामुळे येथील लेण्यात दोन्ही पंथाच्या शिल्प शैलीचा एकोपा दिसून येतो. सध्या या ठिकाणी असलेल्या कोठ्यांना दरवाजे बसवले जात आहेत.
• गंधार - पाले लेणी विषयक माहिती :
सदर लेणी मुंबई गोवा हायवेवर आहेत. यांची निर्मिती ही २००० वर्षापूर्वी म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या ते दुसऱ्या शतकात या लेण्यांची निर्मिती झाली आहे.
महाड हे पुरातन काळी महाडकट नावाचे जनपद होते. याचा उल्लेख मोहोप लेण्यात आलेला आहे. महाड जवळ असलेली गंधार व पाले ही प्राचीन गावे आहेत. बाणकोट खाडी तसेच इतर प्रदेशातून सावित्री नदी व प्राचीन घाट मार्गानं व्यापार चालत असे. समुद्र मार्गे सावित्री नदीतून पुढे गांधारी नदीत व्यापारी जहाजे येत असत. व येथून घाट मार्गानं व्यापार चालत असे. त्यामुळे ही गावे महत्वाच्या व्यापारी मार्गावर येत असत. त्यामुळे या मार्गावर या लेण्यांची निर्मिती झाली आहे.
• शिलालेख :
गंधार पाले लेण्यात ऐकून तीन शिलालेख आहेत. त्यापैकी एक शिलालेखाचा ऐकीवात अर्थ असा आहे.
• ही लेणी पहिल्या दोन शतकात निर्माण केली आहेत.
• ही लयन स्थापत्य कलेत येत असल्याने. यांच्या निर्मितीस खूप कालावधी लागल्याचे दिसून येते.
• इसवी सन १३० ते इसवी सन ३०० या दरम्यान या लेणी खोदल्या गेलेल्या आहेत. विशेषत सातवाहन राजवटी काळात या लेणी खोदल्या गेलेल्या आहेत.
• २७ डिसेंबर १९२७ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या लेण्यांना भेट दिल्याची नोंद आहे.
• भारत स्वतंत्र झाल्यानंतर या लेणी स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आल्या आहेत. त्यांची प्राचीन वारसा म्हणून नोंद केली गेली आहे.
• सध्या या लेणी समूहाचा जीर्णोध्दार करण्यात येत असून एकजूट लेणी अभ्यासक प्रचारक समूह महाराष्ट्र राज्य व प्राचीन बौद्ध लेणी प्रसारक व संवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने या लेण्यांचा जीर्णोध्दार करून लाकडी जाळीदार तावदाने, बाहेरील मार्ग व पायरीमार्ग व इतर सुशोभन केले जात आहे.
• अशी आहे गंधार-पाले बौद्ध लेणी समूहाविषयी माहिती. Gandhar - pale leni samuhavishyi etihasik mahiti.



















